Blog

*कु.माधुरी पवार ‘लोकमत विमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड ने सन्मानित,सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव*

*कु.माधुरी पवार ‘लोकमत विमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड ने सन्मानित,सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव*

अकोला :- समाजातील उपेक्षित घटकांसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सप्तश्रृंगी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा कु.माधुरीताई पवार यांना ‘लोकमत विमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड २०२५’ ने गौरविण्यात आले आहे. अकोला येथील वी.एस.इम्पेरियल, बाळापुर नाका येथे पार पडलेल्या भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्यात त्यांना हा अवार्ड प्रदान करण्यात आला.

हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी खासदार सौ.भावनाताई गवळी, आमदार सौ. श्वेता महाले, आमदार वसंत खंडेलवाल, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभारे, आणि विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे वीज यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शान वाढवली. महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.

माधुरीताई पवार यांनी आपल्या समाजकार्याचा केंद्रबिंदू कायम महिलांचा सन्मान,आत्मभान आणि स्वावलंबन ठेवल्यामुळे त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी विधवा महिलांसाठी ‘हळदीकुंकू’ सारख्या भावनिक उपक्रमांद्वारे त्यांचा आत्मसन्मान जपला, तर तृतीयपंथीय महिलांसाठी देखील सामाजिक सन्मान निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट, प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे अशा उपक्रमांची सतत आखणी करण्यात आली. हे कार्य त्यांनी केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून केले नाही, तर एका व्यापक दृष्टीकोनातून समाज बदलासाठी पावले उचलली आहेत.

शैक्षणिक आणि वैचारिक तयारी असलेली ही नेतृत्त्ववत् व्यक्तिमत्त्व — B.Sc., M.A. (समाजशास्त्र), LL.M. या शैक्षणिक पार्श्वभूमीचा प्रभाव त्यांच्या कामात स्पष्टपणे जाणवतो. माधुरी ताईंनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सोसायटीच्या ठेवींमध्ये तब्बल ₹४० कोटींची वाढ नोंदवून एक कुशल आर्थिक व्यवस्थापक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी घेतलेले ठोस पावले. ‘कचऱ्यातून कला’ या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षण उपक्रमांतून त्यांनी २००० हून अधिक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला, तर प्लास्टिक पुनर्वापरासाठी राबवलेल्या जनजागृती मोहिमेद्वारे ५००० प्लास्टिक पिशव्या पर्यायी उपयोगात आणून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आग्रह धरला.

आरोग्य क्षेत्रात देखील माधुरीताईंनी विशेष लक्ष दिले. मासिक पाळीविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी जनजागृती मोहीम राबवली आणि अनेक महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन व डिस्पोजल यंत्रांची सुविधा उपलब्ध करून दिली. महिलांच्या आरोग्यासाठी मोफत कोलपोसकोपी चाचण्यांचे आयोजन हे त्याच संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण.

त्यांचा सामाजिक दृष्टिकोन हा केवळ पुरोगामीच नाही, तर समावेशकही आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. दरवर्षी लाखो भावांना राख्या पाठवण्याचा उपक्रम असो किंवा ‘कबुतराला गरुडाचे पंख लावले तरी ते गरुड होत नाही, पण आपल्या पंखांत ताकद असेल तर भरारी घेणे सहज शक्य आहे’ या तत्त्वावर चालत त्यांनी जीवनात घेतलेली भरारी — यामुळे त्यांच्या कार्याला केवळ पुरस्कार नव्हे तर लोकांची मनापासून दाद मिळते आहे.

लोकमत विमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड हे केवळ एक सन्मानच नाही, तर माधुरीताई पवार यांच्या अथक प्रयत्नांना मिळालेली सार्वजनिक मान्यता आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आज राज्यभरातील हजारो महिलांच्या जीवनात उमटलेला आहे आणि त्यांचा प्रवास हेच सांगतो की सकारात्मक बदल घडवण्यासाठी एका विचारशील मनाची आणि कणखर इच्छाशक्तीची गरज असते  ती माधुरीताई पवार यांच्याकडे आहे.

त्यांना हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: