
बुलढाणा, 10 मार्च : अफूच्या लागवडीवर कायदेशीर बंदी आहे. पण काही जण हुशारी करून लपून छपून आपल्या शेतात अफूची लागवड करतातच. देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड गावच्या उद्धव पाटीलबा कायंदे (वय 43) यांनी तीळ आणि खरबूज पिकाच्या मधोमध अफूच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्धव कायंदे या ताब्यात घेऊन जवळपास 17 लाख 24 हजार आठशे रुपयांचा अफूचा माल जप्त केला आहे. ही कार्यवाही 9 मार्चच्या संध्याकाळी पार पडली. मिळालेल्या गुप्त माहिती वरुन एलसीबीच्या एपीआय संजय मातोंडकर, पीएसआय दत्ता नरवाडे यांच्या पथकाने उद्धव कायंदे यांच्या मालकीच्या ग्राम उंबरखेड शिवारातील गट क्रमांक 121 मध्ये रेकी करून खबरीची सत्यता पडताळणी केली. यानंतर एलसीबी चे पीआय अशोक लांडे तसेच देऊळगाव राजा नायब तहसीलदार आणि कृषी पर्यवेक्षक यांची उपस्थितीत ओलसर वनस्पतीची ओळख पटवण्यात आली. ती अफूची झाडे असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर घटनास्थळावरून ओलसर हिरवी बोंडे असलेल्या अफुंची झाडे वजन 21 किलो 56 ग्रॅम आणि ठिबक सिंचन च्या नळ्या जप्त करण्यात आल्या. उद्धव कायंदे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे अपराध क्रमांक 86/2025 कलम 8 k, 18 k एन पी डी एस ऍक्ट 1985 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास देऊळगावराजा ठाणेदार संतोष महल्ले करीत आहेत.