मोठ्या शहरांप्रमाणे उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागातील जनतेसाठी राठी कुटुंबीयांचे मोठे योगदान – केंद्रीय मंत्री ना.प्रतापरावजी जाधव
*"जानेफळ येथे राठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन"*

जानेफळ:- आपल्या आजोबांची प्रेरणा घेत उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन सुद्धा मोठे महानगरात किंवा शहरात हॉस्पिटल सुरू न करता जानेफळ सारख्या ग्रामीण भागात मोठे हॉस्पिटल उघडून शहरातील हॉस्पिटल प्रमाणेच उच्च वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध करून देण्याचे काम राठी कुटुंबीयांनी केले असून हे आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठे फायद्याचे ठरणार आहे आणि यामुळे रुग्णांचा पैसा व नातेवाईकांचा त्रास सुध्दा वाचेल त्यामुळे राठी कुटुंबीयांचे ग्रामीण भागातील जनतेसाठी हे एक मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कुटुंब व आरोग्य कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
जानेफळ येथे आज रविवार दि.११मे रोजी राठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे ना.प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून आ.श्वेताताई महाले चिखली, मा.आ.डॉ.संजय रायमुलकर, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे, उपाध्यक्ष डॉ.सतिष कुळकर्णी, सेवानिवृत्त अभियंता रमेश गट्टाणी, प्रांत संघचालक चित्तरंजनदास राठी, महेंद्र रायचुरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी गजानन तात्या कृपाळ, सरपंच सौ.रुपाली वडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की डॉ.राधाकिसनजी राठी यांनी जानेफळ परिसरात उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली त्यानंतर डॉ.धनराज राठी यांनी सुद्धा आरोग्य सेवा सोबतच सामाजिक कार्यात सुद्धा आपले मोठे नावलौकिक मिळविले आहे. एखादा गरीब रुग्ण आला आणि त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नसले तरी त्याला चांगली सेवा देण्याचे काम ते नेहमी करीत असतात आता त्यांचे चिरंजीव डॉ.अंकुश राठी यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन आपली व आपल्या परीवाराची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या जानेफळ सारख्या गावात एक ग्रामीण भागात आधुनिक मशीनरी सह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले आहे हे फार मोठे गौरवाची गोष्ट आहे.यानंतर खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे, आमदार श्वेताताई महाले यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.प्रारंभी ना.प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते फीत कापून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा डॉ. धनराज राठी, जुगलकिशोर राठी, डॉ. हेमराज राठी, दिनेश राठी, सचिन राठी, महेश राठी, डॉ.अक्षय राठी, डॉ.अंकुश राठी, सौ.दिपीका राठी आदिंनी सत्कार केला. सर्व मान्यवरांनी सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आधुनिक व मशीनरींची पाहणी करून स्तुती केली आणि डॉ.अंकुश राठी व सौ.दिपीका राठी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदर उद्घाटन समारंभास जानेफळ व देऊळगाव साकर्शा परीसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामसुंदर मुंदडा,संचालन कृष्णा हावरे तर आभार प्रदर्शन डॉ. अक्षय राठी यांनी केले.